Glyphosate Herbicide Banned In India | ग्लायफोसेट या तणनाशकाच्या देशभरातील वापरावर बंदी

Glyphosate Herbicide Banned In India: ग्लायफोसेट हे देशभर वापरले जाणारे उपयुक्त तणनाशक आहे. हे तणनाशक बिनानिवडक प्रकारातील आहे. कुंदा, हराळी, लव्हाळी अशा बहुवार्षिक व ज्या तणांचे कंद अगर काशा जमिनीत खोलवर पसरल्या आहेत, अशा तणांसाठी ग्लायफोसेट हे अत्यंत प्रभावी तणनाशक आहे.

शेतकरी याचा वापर मागील अनेक वर्षांपासून करीत आले असून त्याचा त्यांना फायदाच झाला आहे. अशावेळी या घातक तणांच्या नियंत्रणासाठी ग्लायफोसेटला पर्याय काय, हेही केंद्र सरकारने स्पष्ट करायला हवे.

Glyphosate Herbicide Banned In India

मुळातच शेतीमध्ये तणांचा प्रादुर्भाव गंभीर होत आहे. शेतामधील मजूर टंचाईने शेतकरी त्रस्त आहेत. त्यात वाढत्या मजुरीच्या दराने निंदणी, खुरपणी ही तण नियंत्रणासाठीची कामे खूपच खर्चीक झाली आहेत. तणनाशकांचा वापरातून कमी खर्चात प्रभावी तण नियंत्रण होते. शून्य मशागत तंत्रात पिकाचे जमिनीखालचे अवशेष मारण्यासाठी ग्लायफोसेट हे सर्वांत उपयुक्त तणनाशक मानले जाते.

ग्लायफोसेटला सक्षम पर्याय

अशावेळी ग्लायफोसेटला सक्षम पर्याय न देताच त्याच्या वापरावर निर्बंध लादल्यास तणांचा प्रादुर्भाव वाढून देशभरातील शेती धोक्यात येईल. शिवाय या निर्णयामुळे शून्य मशागत सारख्या कमी खर्चाच्या तंत्रज्ञान वापराला देशात आळा बसेल. देशात अनधिकृत एचटीबीटीस प्रोत्साहन मिळू नये, हाही ग्लायफोसेटवर निर्बंध लादण्यामागचे एक कारण असल्याचे बोलले जाते.

परंतु देशात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या जीईएसीने जीएम मोहरीच्या व्यावसायिक लागवडीला नुकतीच परवानगी दिली आहे. एचटीबीटीच्या व्यावसायिक लागवडीला परवानगीची मागणी देशभरातील शेतकरी मागील काही वर्षांपासून करीत आहेत. या सर्व बाबींचा तसेच शेतकरी हितार्थ विचार करून ग्लायफोसेटवरील बंदीचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ मागे घ्यायला हवा.

error: Content is protected !!